Wednesday, August 31, 2022

अष्टविनायक दर्शन| Ashtavinayak |Ganpati Maharashtra

 पालीचा बल्लाळेश्वर भाग:८


अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वरओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता.

नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले.
या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत, गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत.


सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाच्या गावात (पाली गावात) कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा त्याचा गणेशमूर्तिपूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला. हळूहळू तो गणेशचिंतनात रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेशभक्तीचे वेड लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेशमूर्तीचे भजन-पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेठ्जीकडे जाऊन 'बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले' अशी तक्रार करू लागले.

आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. त्या रागाच्या भरातच तो एक भलामोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेला. तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेशमूर्तीची पूजा करीत होता. सारेजण गणेशाचे भजन करीत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत, शिव्या देतच तेथे धावला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली; पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळास सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्याने बल्लाळाला तशा अवस्थेच एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले. कल्याण शेठ रागाने म्हणाला, 'येऊ दे तुझा गणेश आता तुला सोडवायला. घरी आलास तर ठार मारीन, तुझानी माझा संबंध कायमचा तुटला.' असे म्हणून कल्याण शेठ निघून गेला.

थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे शरीर ठणकत होते. तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. ''हे देवा, तू विघ्ननाशक आहेस. तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस… ज्याने गणेशमूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन.'

बल्लाळाचा धावा ऐकून विनायक-गणेश ब्राह्मण रुपात प्रगट झाला. बल्लाळाचे बंध तुटले. त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, ''तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्या भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील. आता तुला हवा तो वर माग.''

तेव्हा बल्लाळ म्हणाला – ''तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी.''

तेव्हा गणेश म्हणाला – ''तुझ्या इच्छेनुसार मी इथे 'बल्लाळ विनायक' या नावाने कायमचे वास्तव्य करीन. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनःकामना पूर्ण होतील.'' असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावला. तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
कसे पोहचाल:
बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात येते.
पुण्यापासून बल्लाळेश्वर ११० किलोमीटरवर आहे पुणे-लोणावळा-खोपोलिमार्गे बल्लाळेश्वरला जाता येते.




महडचा श्री.वरदविनायक भाग:७


महड वरदविनायक (समृद्धी व यश देणारा) येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले.

या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे.


फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.

काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.

एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.

शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.

इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते

कसे पोहचाल:
खोपोलीच्या अलिकडे ६ कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८३ कि.मी आहे.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे.
कर्जत ते महड फाटा एस.टी. बसेस आहेत. महड फाटय़ापासून देवस्थान दीड कि.मी. आहे. पायी जाण्यास सोपे


लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक भाग-6

लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ गुहा असलेल्या एका बौद्ध गुहांच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर ८ व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असेसुद्धा संबोधिले जाते.

 मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो  मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.



असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.

गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.

ओझरचा विघ्नहर भाग:5

 
ओझरचा विघ्नहर हा पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकापैकी एक गणपती आहे. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.ओझर मधील श्री विघ्नहर हा अष्टविनायकापैकी  सर्वात श्रीमंत गणपती आहे. ओझर हे गाव कुकडी नदीवर वसलेले आहे

१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.
विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.


राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्‍नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.

पुणे नाशिक रोडवरील जुन्नर तालुक्यात ओझरचे विघ्नेश्वर मंदिर वसले आहे. नाशिक रोडवरील जुन्नर तालुक्यात ओझरचे विघ्नेश्वर मंदिर वसले आहे.


रांजनगावचा श्री महागणपती भाग:४

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे, व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनी या मूर्तीसाठी तळघर बांधले.


मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसविले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली. गृत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासूर हा गणेशाने दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला होता. त्याने सर्व देवांनाही जिंकले. सर्व देवांच्या विनंतीवरून भगवान शंकराने या दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले व येथे शंकराने विनायकास प्रसन्न करून घेतले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस याच ठिकाणी शंकराने त्रिपुरासुराचे पारिपत्य केले. त्यावेळेपासून या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणण्यात येऊ लागले.


महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी चौथा गणपती रांजणगावात आहे. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. 

स्थान- ता. शिरूर जि, पुणे हे स्थान पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर आहे.
अंतर- रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी, जवळच्या न्हावेरपासून पुणे-सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते



थेऊरचा चिंतामणी भाग :३


थेऊरचा चिंतामणी हा पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकापैकी एक आहे.
चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची, आसन घातलेली व पूर्वाभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत.


 गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.
 हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे.


मुळा-मुठा नदींने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे-सोलापूर रेल्वेमार्गावर पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त सात कि.मी.वर आहे
ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे. यासंदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्‍न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्‍न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्‍न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्‍न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले.
चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.
मंदिर पुण्याहून पुणे-सोलापूर महामार्गे २२ किमी अंतरावर आहे. मुळा-मुठा-भीमा या तीन नद्यांच्या संगमावर थेऊर वसलेले आहे. थेऊर हे पुण्याच्या जवळ आहे. हे मंदिर खोपोली-जुना मुंबई पुणे महामार्गे खंडाळ्याच्या थोडे आधी आहे. थेऊर हे पुणे-सोलापूर महामार्गाच्या थोडेसे आडवाटेवर एका तासाच्या अंतरावर आहे.

२)


भाग २:सिद्धटेकचा सिध्देश्वर
 

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.
सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.


आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने “ॐ” काराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होता तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही.

विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला “ॐ गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.




भाग :१ मोरगावचा मोरेश्वर

पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे मयुरेश्वराचे मंदिर आहे.  हे गाव कऱ्हा  नदी काठी वसलेले आहे.अष्टविनायकाची यात्रा मोरेश्वराच्या दर्शनाने सुरू होते.

मोरावर बसून दैत्यांच्या पराभव केला म्हणून गणेश "मोरेश्वर" किंवा "मयुरेश्वर" या नावाने ओळखले जाऊ लागले. म्हणून गावास मोरगाव म्हणून ओळखले जाते.

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. मयुरेश्वर मंदिर, मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे,पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत.


मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. गाभाऱ्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले


कसे पोहचाल:

१)पुणे रेल्वे स्टेशन पासून मोरगाव, हडपसर-सासवडआणि जेजुरीमार्गे ६४ कि.मी. वर आहे.

२)पुण्यापासून मोरगाव हे ६७ की.मी.अंतरावर आहे तर बारामतीपासून ३९ की.मी.अंतरावर आहे.

                       गणपती बाप्पा मोरया









No comments:

Post a Comment