Wednesday, November 30, 2022

डिसेंबर दिनविशेष| Dinvishesh December

डिसेंबर दिनविशेष

संकलन:श्री.नंदकुमार रेडेकर .जिल्हा परिषद शाळा आरल 

 १ डिसेंबर :

एड्स प्रतिबंधक दिन.

इ.स. १८८५ – जेष्ठ साहित्यिक, गांधीवादी, आचार्य काका कालेरकर यांचा जन्म.

इ.स. १९०९ – मराठी कवितेस नवे वळण देणारे कवी बा. सी. मर्ढेकर यांचा जन्म.

इ.स. १९६५- भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना.

इ.स. १९८५ – स्वातंत्रसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांच निधन.

इ.स. १९९०  – मुत्सद्दी , राजकारणी विजयलक्ष्मी पंडित यांचे निधन.


२ डिसेंबर :

जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन. 

जागतिक संगणक साक्षरता दिन.

इ.स.  १८८५ – कायदेपंडित तथा समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म.

इ.स. १९०५ – अनंत काणेकर यांचा जन्म.


३ डिसेंबर:

जागतिक अपंगदिन. 

इ.स.१८८४ – भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेन्द्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म.

इ.स.१९५१- कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन.

इ.स. १९७१ – भारत-पाकिस्तान यांच्यात तीसरे युद्ध सुरु.

इ.स. १९७९ – हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचे निधन.


४डिसेंबर :

भारतीय नौसेना दिवस.

इ.स. १९२४ – गेट वे ऑफ इंडिया या वास्तुचे व्हाईसरॉय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.

इ.स. १९४८ -भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली.

इ.स. १९६७ – थुंबा येथील तळावरून रोहिणी या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी  उड्डाण.

इ.स. १९७१ – ऑपरेशन ट्रायडेंट या नावाखाली भारतीय नौसेनेचा पाकिस्तानच्या कराची शहरावर हल्ला. दोन विनाशिकांसह तीन पाकिस्तानी युद्धनौका बुडाल्या, अनेक उद्ध्वस्त.


५ डिसेंबर :

जागतिक मृदा दिन. 

इ.स. १९४३ – डॉ. लक्ष्मण देशपांडे प्रख्यात मराठी लेखक दिग्दर्शक व कलाकार यांचा जन्म.

इ.स. १९५० – योगी अरविंद घोष यांचे निधन.

इ.स. २०१३ दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती,नोबेल पारितोषिक विजेते, भारतरत्न नेल्सन मंडेला यांचे निधन.

इ.स. २०१६ – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे निधन.


६ डिसेंबर :

इ.स. २००० – थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब  आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इ.स. १९५६ – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचे दिल्ली येथे  निधन.


७ डिसेंबर :

विमानवाहतुक दिन. 

इ.स.१८२५ – बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज.

इ.स. १९४१ – दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला.


८ डिसेंबर :

सार्क दिवस.

इ.स. १७२० – बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे यांचा जन्म.


इ.स.१८७७ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित नारायण सदाशिव मराठे यांचा जन्म.


इ.स. १८९७ – कवी पंडित बाळकृष्ण शर्मा उर्फ नविन यांचा जन्म.


इ.स. १९३५ – प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म.


इ.स. १९८५ सार्क परिषदेची स्थापना.


९ डिसेंबर :

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी  दिन. 

इ.स. – १९०० अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेउन स्वामी विवेकानंद मुंबईत परतले

इ.स. १९०० – डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धांची सुरुवात झाली.

इ.स. १९४६ दिल्ली मध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.

इ.स. १९९५- बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.


१० डिसेंबर :

मानवी हक्क दिन. 

इ.स. १८७० – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म.

इ.स. १८८० – प्राच्यविद्या पंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म.

इ.स. २००१ – हिंदी चित्रपट अभिनेते ‘दादामुनी’ अशोक कुमार यांचे निधन.

इ.स. २००९ – लेखक,कवी, चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन.


११ डिसेंबर :

यूनिसेफ दिन

इ.स. १८९९ – कादंबरीकार पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म.

इ.स. १९२२ – अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म.

इ.स.१९२५ – मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर याचा जन्म.

इ.स. १९३१ – आचार्य रजनीश उर्फ ओशो यांचा जन्म.

इ.स.- १९४६ यूनिसेफची  स्थापना.

इ.स. १९६९- भारतीय बुध्दिबळ खेळाडू , ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदचा जन्म.

इ.स.१९४० – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांचा जन्म.

इ.स. १९४९ – भारतीय जनता पार्टीचे नेते मा. गोपीनाथ मुंडे यांचा जन्म.

इ.स. १९९२ – पं. महादेव शात्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे जनक, यांचा मृत्यु.

इ.स. २०१५-  शरद अनंत जोशी, शेतकरी संघटनेचे नेते, यांचा मृत्यु.


१३ डिसेंबर :

इ.स. १९८६ – प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांचे निधन.

इ.स. १९९४ – वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक तात्यासाहेब कोरे यांचे निधन.

इ.स. २००१- भारतीय संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला.


१४ डिसेंबर :

उर्जा संरक्षण दिन.   

इ.स. १५०३ – प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता, गणितज्ञ नोस्त्रडेमस यांचा जन्म.

इ.स. १७९९ – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन.

इ.स. १९०३ – राईट बंधूंनी किटीहॉक, नॉर्थ कॉरोलिना येथे विमान उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.

इ.स. १९२९ – प्रभातचा  गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

इ.स.१९७७ गीतकार, कवी,लेखक,पटकथाकार,अभिनेते गजानन दिगंबर तथा ग.दि.माडगूळकर यांचे निधन.


१५ डिसेंबर :

इ.स. १७४९ – छत्रपती शाहूजी महाराज यांचे निधन.

इ.स. १८०३ – नागपूरकर भोसले यांनी ओरिसाचा ताबा ईस्ट इंडिया कंपनीकड़े दिला.

इ.स. १९७१ – बांग्लादेश पाकिस्तान पासुन स्वतंत्र झाला.

इ.स. १९९१ – चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

इ.स. १९९८ – बँकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये  सलग तीसरे सुवर्णपदक मिळाले.


१६ डिसेंबर :

राष्ट्रीय पत्रकार दिन. 

इ.स. १८५४ – भारतातील पहिल्या इंजिनीअरींग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.

इ.स. १९०३ – मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.

इ.स. १९७१ – भारतासमोर पाकिस्तानने शरणागती पत्करली.


१७ डिसेंबर :

इ.स. १९२७ – हिन्दुस्थान रिपब्लिक असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने नियोजित तारखेच्या दोन दिवस आधी फाशी दिली .

इ.स. १९२८ – भगतसिंग, सुखदेव,राजगुरु यांनी ब्रिटिश पोलिसअधिकारी जेम्स सॅडर्स याची लाहोर येथे हत्या केली.

इ.स. १९६१ – गोवा पोर्तुगालपासुन मुक्त झाले.


१८डिसेंबर :

आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 

अल्पसंख्याक हक्क दिन.       

इ.स. १९३५ – श्रीलंकेत लंका सम समाज पार्टीची स्थापना केली.

इ.स. १९५८ – जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.


१९डिसेंबर :

इ.स. १९२७ – राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाक़ उल्ला खां या क्रांतिकारकाना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.

इ.स. १९३४ – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा जन्म.

इ.स. १९४१ -अडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.

इ.स. १९६१ – पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेलेदमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.

इ.स. २००२ – व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला.


२० डिसेंबर :

मानवी ऐक्यभाव दिन.

इ.स. १९४५ – मुंबई – बंगळुरु प्रवाशी विमानसेवा सुरु झाली.

इ.स. १९७१ – झुल्फिकारअली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रध्यक्ष बनले.


२१ डिसेंबर :

इ.स. १९०९ – अनंत कान्होरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला.


२२ डिसेंबर :

राष्ट्रीय गणित दिवस.

सूर्याच्या उत्तरयाणास प्रारंभ.   

उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात लहान दिवस.

इ.स. १६६६ – शिखांचे १० वे गुरु – गुरु गोविंद सिंग यांचा जन्म.

इ.स. १८५१ – जगातील पहिली मालगाड़ी रुरकी येथे सुरु झाली.

इ.स.१८८७- थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म.


२३ डिसेंबर :

भारतीय किसान दिन. 

इ.स. १९४० – वालचंद  हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एयरक्राफ्ट हा भारतातील पहिला विमान निर्मितीचा कारखाना सुरु केला.

इ.स. २००१ – बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. (उंची१०४ फुट).

इ.स. २०१३ – एके ४७ रायफलचे निर्माते मिखाइल कलाशनिको यांचे निधन.


२४ डिसेंबर :

राष्ट्रीय ग्राहक दिन.

इ.स. १७७७ – कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितिमती बेटांचा शोध लावला.

इ.स. १९२४ – अल्बानिया या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळाले.

 

२५ डिसेंबर :

ख्रिसमस डे – येशू ख्रिस्ताचा जन्म. 

इ.स. १९२४ भारताचे १० वे पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म.

इ.स. १९७६ – ‘आय.एन.एस. विजयदुर्ग ‘ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

इ.स. १९९० – वर्ल्ड वाइड वेब (www) पहिली चाचणी यशस्वी.


२६ डिसेंबर :

इ.स. १८९८ – मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम  हे मुलद्रव्य वेगळे केले.

इ.स. १९९७ – विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फाउन्डेशन पुरस्कार.


२७ डिसेंबर :

इ.स. १८९८- भारताचे पहिले कृषिमंत्री – डॉ. पंजाबराव देशमुख  यांचा जन्म.

इ.स. १९११ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात ‘ जन गण मन’ हे रविंद्रनाथ  टागोर यांनी रचलेले व संगीतबध्द केलेले गीत प्रथमच म्हटले गेले.

इ.स. १९४५ – २९ देशानी केलेल्या करारानुसार जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेंनिधी यांची स्थापना करण्यात आली.


 २८ डिसेंबर :

इ.स. १६१२ – गॅलिलिओ याने नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला.

इ.स. १८८५ – मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना.

इ.स. १९३७ – उद्योगपती रतन टाटा यांचा जन्म.


 २९ डिसेंबर :

इ.स.१८४४- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बॅनर्जी यांचा जन्म.

इ.स. १९३० – सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिध्दांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टिकोन मांडला.

इ.स. १९५९ – पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची  सुरुवात झाली.


३० डिसेंबर :

इ.स.१९०२ – घटना समितीचे सदस्य, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,भाषाशास्त्रज्ञ डॉ.रघू वीरा यांचा जन्म.

इ.स. १९०६ – ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाक्का येथे स्थापना.

इ.स. १९२४ – एडविन हबलने आकाशगंगाखेरीज इतर दीर्घिकांही अस्तित्वात असल्याचे जाहीर केले.

इ.स. १९४३ – सुभासचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.


३१ डिसेंबर :

इ.स. १६०० – ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना

इ.स. १८०२ – इंग्रज व बाजीराव दूसरा यांच्यात वसईचा तह

इ.स.१८७९ – एडीसनने मेन्लोपार्क , न्यू जर्सी  येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखविले

इ.स. १९९९ – पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण आले.

Sunday, November 27, 2022

महात्मा फुले |Mahatma Phule

 


    जोतीराव गोविंदराव फुले 

जन्म दिनांक-११ एप्रिल १८२७

 मृत्यू दिनांक- २८ नोव्हेंबर १८९०

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

असे थोर विचार मांडणारे व रायगडावरील छ. शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे महान समाजसुधारक म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते.

महात्मा जोतिबा फुले  यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिबांचे आजोबा शेरीबा गोऱ्हे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावर पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोऱ्हे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर जोतिबांचे काका राणोजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर जोतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. त्यांचे मूळ गाव कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते.



महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या The Right Of Man, Justice and Humanity, Common SenseThe Age of Reason या पुस्तकाचा प्रभाव होता.


जुलै १८८७मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुलेंचे मध्यरात्री २ वाजता पुणे येथे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.


महात्मा जोतिबा फुलेंचे बालपण आणि शिक्षण:

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुलेंचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये वयाच्या १४ व्य वर्षी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा जोतिबा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तामिळ, गुजराती इत्यादी भाषा येत असत.

महात्मा जोतिबा फुलेंचे शैक्षणिक कार्य:

१) अहमदनगर मिशनरी स्कूल व या स्कूलच्या प्रा. मिस फरारकडून प्रेरणा घेऊन ३ ऑगस्ट १९४८ रोजी जोतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडेंच्या वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पहिल्या दिवशी या शाळेत ८ मुली उपस्थित होत्या. महात्मा जोतिबांनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्यध्यापिका बनविले. शूद्रांसाठी शिक्षणाच्या कार्यामुळे झालेला विरोध बघून जोतिबांना त्यांच्या पत्नींसोबत गृहत्याग करावा लागला. यानंतर त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील उस्मानशेख यांच्या वाड्यात मुक्काम केला.

२) १८५० – ३ जुलै १८५१ रोजी चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा, तर १७ सप्टेंबर १८५१ रोजी रास्ता पेठेत तिसरी शाळा स्थापन केली. यानंतर १५ मार्च १८५२ रोजी वेताळपेठेत भिडे यांच्या वाड्यात मुलींची अजून एक शाळा सुरु केली. १८५२ साली नेटिव्ह फिमेल स्कूल सभा पूना लायब्ररीची स्थापना केली.

३) १९ मे १८५२ रोजी महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी भारतातील पहिली शाळा सुरू करून धुराजी चांभार व गणू शिवाजी मांग हे दलित शिक्षक अध्यापनासाठी नेमले. यावेळी त्यांचे सहकारी सदाशिव गोवंडे, सखाराम परांजपे, विठ्ठल वाळवेकर, वामन प्रभाकर भावे, विनायक भांडारकर यांनी त्यांना मोलाची मदत केली.

४) शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल पुणे महाविद्यालयाचे (सध्याचे डेक्कन कॉलेज) प्रा. मेजर थॉमस कँडी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात सरकारी विद्या खात्याकडून जोतिबांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता.

५) महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सप्टेंबर१८५३ मध्ये महार, मांग आदी लोकांना शिकविण्यासाठी ‘मंडळी’ नामक संस्था स्थापन केली. तर १९५५ मध्ये प्रौढांसाठी देशातील पहिली ‘रात्र शाळा’ त्यांनी स्थापन केली.

६) १८८२ साली भारतातील शिक्षण विषयक स्थापन करण्यात आलेल्या हंटर कमिशनसमोर फुलेंनी साक्ष देऊन १२ वर्षांखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, शिक्षक प्रशिक्षित असावे, शिक्षक बहुजनातीलही असावे, जीवनोपयोगी व्यवहारी शिक्षण द्यावे, आदिवासी जाती जमातींना शिक्षणात प्राधान्य, शेतीचे व तांत्रिक शिक्षण द्यावे, वसूल केलेल्या शेतसाऱ्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च करावी, महाविद्यालयीन शिक्षण जीवनातील गरजा भागविणारे असावे अशा महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण मोफत, सार्वजनिक व सक्तीचे केले जावे अशी मागणी करणारे महात्मा जोतिबा फुले हे आशिया खंडातील पहिले शिक्षण तज्ञ होते.


महात्मा जोतिबा फुले यांच्या सामाजिक सुधारणा:

१) १८९५ साली फुलेंनी वयाच्या२८ व्या वर्षी पुण्यात ‘तृतीय रत्न’ हे पहिले नाटक लिहिले. हे जोतिबांचे पहिले पुस्तक व मराठीतील पहिले सामाजिक नाटक म्हणून ओळखले जाते.

२) २८ जानेवारी १८६३ रोजी पुणे येथील आपल्या राहत्या घरी भारतातल्या पहिल्या बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. यानंतर पंढरपुरातही अशा गृहाची स्थापना केली. पुणे येथील बालहत्या प्रतिबंधगृहात काशीबाई नातू महिलेने एका मुलाला जन्म दिला. पुढे १८७३ मध्ये याच मुलास फुले दाम्पत्याने दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. हाच यशवंत नंतर डॉक्टर झाला.

३) १८७७ साली पुण्यातील धनकवडी येथे दुष्काळपीडित विद्यार्थ्यांसाठी कॅम्प उभारला. तसेच ‘व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची’ स्थापना केली.

४) विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतूर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.

५) ८ मार्च १८६४ रोजी गोखलेंच्या बागेत विधवा पुनर्विवाह घडवून आणला.


महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य:

महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला.‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

महात्मा फुले यांचा मृत्यू दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.


Sunday, November 13, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Jawahar lal Nehru




 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला .

पंडित नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.त्यांना लहान मुले खूप आवडतं. मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.पंडित नेहरूंचे नाव जवाहरलाल असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल तर आईचे नाव स्वरूपराणी असे होते.

 आपले सुरुवातीचे शिक्षण घरी खासगी शिक्षकांकडून घेतले. वयाच्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले आणि हॅरो येथे दोन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. या विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली. 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी सरळ राजकारणात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असतानाही, परकीय जुलमी राजवटीखालील देशांच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांना रुची होती. आयर्लंडमध्ये झालेल्या सिन फेन आंदोलनाबाबत त्यांना विशेष स्वारस्य होतं. भारतात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यावाचून त्यांना पर्याय नव्हता.



1912 मध्ये एक प्रतिनिधी म्हणून ते बांकीपूर काँग्रेसला उपस्थित राहिले. 1919 मध्ये अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. 1916 मध्ये ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले. त्यांनी 1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं. 1920-22 दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.


सप्टेंबर 1923 मध्ये नेहरू अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले. 1926 मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशियाचा दौरा केला. बेल्जिअममध्ये ब्रुसेल्स येथील गरीब देशांच्या संमेलनाला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. 1927 मध्ये मॉस्को येथे ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले. तत्पूर्वी 1926 मध्ये मद्रास काँग्रेसमध्ये काँग्रेसला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाप्रती कटिबध्द बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. 1928 मध्ये लखनौमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात एका मिरवणुकीचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. 29 ऑगस्ट 1928 रोजी त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत भाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्याचवर्षी त्यांनी “भारतीय स्वातंत्र्य लीग”ची स्थापना केली आणि त्याचे सरचिटणीसही झाले. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मूळ उद्देश होता.


1929 मध्ये पंडित नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. 1930-35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं. सुटका झाल्यानंतर आपल्या आजारी पत्नीला पाहण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले. फेब्रुवारी-मार्च 1936 मध्ये त्यांनी लंडनचा दौरा केला. जुलै 1938 मध्ये त्यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा तिथे नागरी युध्द सुरू होतं. दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी ते चीनच्या दौऱ्यावरही गेले होते.


31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली. डिसेंबर 1941 मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प सोडला. 8 ऑगस्ट 1942 रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर किल्ल्यावर त्यांची रवानगी करण्यात आली. ही त्यांची सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण 9 वेळा त्यांना तुरुंगवास घडला. जानेवारी 1945 मध्ये सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या आयएनएचे अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च 1946 मध्ये त्यांनी दक्षिण-पूर्व आशियाचा दौरा केला. 6 जुलै 1946 रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि 1951 ते 1954 पर्यंत आणखी तीन वेळा ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.अनेक आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यात त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांना १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पंडित नेहरू यांचा मृत्यू 27मे 1964 साली नवी दिल्ली येथे झाला.

पंडित नेहरू यांनी लिहिलेली पुस्तके

आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग.गोरे

इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)

भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी