Wednesday, January 11, 2023

राजमाता जिजाबाई शहाजी भोसले Rajmata Jijau

 


राजमाता जिजाबाई शहाजी भोसले:

जन्म:

जानेवारी १२, इ.स. १५९८

सिंदखेडराजा, बुलढाणा

मृत्यू:

१७ जून, १६७४ (वय ७६)

पाचाड, रायगडचा पायथा


  मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.

  लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासऱ्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.


जिजाबाईंना एकूण सहा (६) अपत्ये होती. त्यापैकी ४ दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.


जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.


मुलाचे संगोपन व राजकारभार:

शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.


शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.


जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. हे सर्व गुण त्यांनी त्यांचा शिवरायांना दिले. त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशलतेने तलवार चालवू शकत होत्या.


त्यांचा मोठा मुलगा संभाजीचा मृत्यू अफझलखानाने केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, जे त्यांनी पूर्ण केले.


पुणे येथील आपल्या पतीची जहागीर त्यांनी समर्थपणे चालवून त्याचा विकास केला. त्यांनी कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना केली. तसेच केवरेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार केला.


शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पार पाडली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.


शिवरायांच्या पहिल्या पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांचे जुलमाने धर्मपरिवर्तन झाले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.


राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.

मृत्यू:

१७ जून १६७४ रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. तेव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले होते.

Thursday, December 29, 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले

क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले 

जन्म:३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी नायगाव(सातारा) 

त्या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. 


सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते.इ.स. १८४० साली जोतीराव फुले यांचेशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना "फुले" हे आडनाव मिळाले.


सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. 


सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले.मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.

जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.


सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. 

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या.प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन पुणे येथे झाले.


सावित्रीबाई आणि त्यांचा दत्तक मुलगा यशवंत यांनी १८९७ मध्ये नालासोपारा परिसरात बुबोनिक प्लेगच्या जगभरातील तिसऱ्या साथीच्या रोगाने प्रभावित झालेल्यांवर उपचार करण्यासाठी एक क्लिनिक उघडले.क्लिनिकची स्थापना पुण्याच्या बाहेरील भागात, संसर्गमुक्त भागात करण्यात आली. पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंचा वीरतापूर्वक मृत्यू झाला. गायकवाड यांच्या मुलाला मुंढव्याबाहेरील महार वस्तीत प्लेग झाला हे कळताच सावित्रीबाई फुले त्यांच्या पाठीशी धावून गेल्या आणि त्यांना पाठीवर घेऊन रुग्णालयात नेले. या प्रक्रियेत, सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी रात्री ९.०० वाजता त्यांचा मृत्यू झाला.



पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासुन ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन” म्हणून साजरा केला जातो.


सावित्रीबाई फुले प्रकाशित पुस्तके:


काव्यफुले (काव्यसंग्रह)


सावित्रीबाईंची गाणी (१८९१)


सुबोध रत्नाकर


बावनकशी


जोतिबांची भाषणे (संपादक सावित्रीबाई फुले १८५६)